आज सकाळी गरमा गरम चहा पिताना अचानकच मनात विचार आला. बापरे! बघता बघता सहा महिने होत आले आणि आपण घरातच. फेब्रवारीमध्ये कोरोना व्हायरस ने भारतात entry काय मारली मार्च मध्ये तर अख्खा भारत देश बघता बघता बंद देखील झाला. करोडोंचे व्यवहार ठप्प झाले तेही एका दिवसात, लोकांचं जनजीवन जिथल्या तिथे थांबल तेही एका दिवसात, कारण आपल्या भारतात लॉकडाउन लागलं. 21 दिवसांच्या लॉकडाउन ने सुरुवात झाली. लोकांना, लहान मुलांना घरात थांबायची सवय नसल्याने सुरुवातीच्या काळात प्रत्येकालाच हे २४ तास घरात राहणं जड जाऊ लागलं. लोकांना ही गोष्ट मान्य करायला त्रास होऊ लागला. अगदीच २४ तास फक्तच घरात राहायचं ह्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकातच चिडचिडेपणा वाढायला लागला आणि ते अगदीच सहाजिक होत कारण रोजच रूटीन बिघडल होत. शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्यानंतर कदाचितच एवढा मोठा रिकामा वेळ घरातील वडीलधाऱ्या माणसांना, काम करणाऱ्या youngesters ला मिळाला असावा. परंतु लोकांना कळतच नव्हत की हे दिवस घालवायचे तरी कसे? रोजच्या रूटीन मधून मिळालेला ब्रेक स्वतःसाठी कसा वापरता येईल ह्यावर सगळेच जण विचार करायला लागले. कारण उशीरा उठण, आरामात आवरण आणि जेवण करून परत फक्त आराम करण हे सुरुवातीचे ४ दिवस बर वाटतं परंतु काही काळानंतर आरामाचाही कंटाळा यायला लागतो मग अश्या वेळी करावं तरी काय?? बरं २१ दिवसानंतरही सगळं चालू होणार की नाही ह्याची शाश्वती नव्हतीच मग "वेळ घालवणे" ह्यावर रामबाण उपाय शोधावा लागणार होता अशातच आरोग्याबद्दल अधिक सतर्क असणाऱ्या काही लोकांनी 21 Days Fitness Challenge हा खेळ चालू केला आणि बघता बघता ह्या खेळाला उस्फुर्त प्रतिसाद मिळू लागला आणि सगळ्यांच्याच हे लक्षात यायला लागलं की कामाच्या धावपळीत आपण आपल्या आरोग्याकडे किती दुर्लक्ष करतो आहोत,
व्यायामाबरोबरच आपण आपल्या आहाराकडे लक्ष द्यायला लागलो आणि ह्या गोष्टींमुळे नकळतच आपण स्वतःची काळजी घ्यायला लागलो. पैसा लोकांकडे जरा कमी प्रमाणात येत होता तरी लोक आनंदाने जगायला शिकले. मागच्या काही वर्षांमध्ये औद्योगिक प्रगती फार झाल्याने आपण सगळेच सात्विक आहारापेक्षा बाहेरच्या खाण्यापिण्याकडे जास्त आकर्षित व्हायला लागलो होतो कारण कामाच्या व्यापामुळे सगळ्याच गोष्टी घरी तयार करून खाणे शक्य नव्हते परंतु ह्या लॉकडाउन च्या काळात भेळ, पाणीपुरी पासून पिझ्झा पर्यंत सगळ्याच गोष्टी आपण घरी बनवायला शिकलो. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त चांगला पदार्थ कसा बनवायचा ह्याची कला आपण आत्मसात करायला लागलो.
लहानपणीचे अडगळीत पडलेले गेम बाहेर यायला लागले. नेट surfing पेक्षा घरच्या लोकांसोबत बसून पत्त्यांचे डाव मांडणं आपल्याला जास्त आवडायला लागलं, मित्रांसोबत फोनवर गप्पा मारण्यापेक्षा जेवताना घरच्यांसोबत बसून गप्पा मारण सगळ्यांनाच जास्त आवडायला लागलं. बापरे!! केवढा हा बदल.... आपल्याच बहिण - भावांचे छंद, आई - वडिलांच्या आवडी आपण नव्याने जाणून घ्यायला लागलो आणि त्याला नव्याने वाव द्यायला शिकलो. ह्या लॉकडाउन च्या काळात आपली खरी strength ही आपली फॅमिली आहे हे आपल्याला नव्याने कळायला लागलं. प्रत्येक घरातून आता टाळ्यांचे, हसण्याचे, गप्पांचे आवाज यायला लागले.