*माझ्याविरुद्ध मी*
मंजिल तक पहुँचने से रोके
वो नही कोई गैर,
तुम को रोक रहे हैं,
तुम्हारे अपने पैर...
ह्या चारच ओळी पण किती गांभीर्य आहे ह्या शब्दात. आपणच आपल्याला थांबवतो का? आपणच आपल्या विरुद्ध असतो का? हे वाक्य ऐकून असे अनेक प्रश्न अनेकांना भेडसावत असतील. पण हो हे खरंय..कोणाच्यातरी विरुद्ध जाण्याआधी किंवा कोणीतरी आपल्या विरुद्ध होण्याआधी आपणच आपल्या विरुद्ध असतो. आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा असा समज झालेला आहे की,"आपल्याविरुद्ध लोक" म्हणजे आपले स्वप्न पूर्ण करण्यापासून किंवा आपले ध्येय साध्य करण्यापासून आपल्याला लोक थांबवतात पण हे साफ खोटं आहे. जर आपल्याला कोणी थांबवत असेल तर ते स्वतः आपण आहोत. ते कसं?? असा प्रश्न देखील सगळ्यांनाच पडला असणार, तर ह्याच सगळ्यात मोठ कारण म्हणजे " नकारात्मक विचार" . मला हे जमेल का? मी हे करू शकेल का? मला हे नाही जमल तर? हे आणि ह्यासारखे अनेक प्रश्न आपण स्वतःच्या डोक्यात आणि मनात येऊ देतो आणि स्वतःवरच प्रश्नचिन्ह उभं करतो. ह्या सगळ्यांमध्ये आपला आत्मविश्वास डगमगतो आणि आपण आपल्याबद्दल आपोआपच नकारात्मक बनु लागतो. जेव्हा लोकांच्या हे लक्षात येतं तेव्हा लोक फक्त आपल्या नकारात्मक विचारांना खत - पाणी घालतात पण आपण मात्र त्यांच्यावर आपल्या अपयशाचा खापर फोडून मोकळं होतो कारण ते खापर आपल्याला स्वतः वर फोडायच नसत.
असं म्हणतात, माणूस अपयश पचवू शकत नाही पण त्याहीपेक्षा ते अपयश स्वतः मुळेच आलंय हे मान्य करायला आपण कधीच तयार होत नाही आणि मग आपण कारण शोधायला लागतो. पण आपण स्वतः ला हे कधी विचारायचा साधा प्रयत्न तरी केलाय का की खरचं हे अपयश कशामुळे आल? कोणामुळे आल? कोणतीही गोष्ट करण्यासाठी प्रयत्न तर आपल्यालाच करावे लागणार आणि मग त्या प्रयत्नानंतर येणार यश किंवा अपयश हे सुध्दा सर्वस्वी आपलंच असणार फक्त आपल्याला ते मोठ्या मनाने स्वीकारता आल पाहिजे. जर अपयश आलं तर का माणूस खचून जातो? खरचं इतकं कमकुवत आहे आपल मन की आपण त्या मनाला कमकुवत बनवलं आहे?
जर यश आल तर माणूस हुरळून जातो आणि जर अपयश आल तर माणूस खचून जातो असं म्हणतात पण ह्या दोन्ही गोष्टी आपणच आपल्याविरुद्ध करत असतो. आपण हे विसरून जातो आपल यश, अपयश, आपले निर्णय हे सर्वस्वी आपले आहेत. त्याच खापर लोकांवर फोडण्याचा आपल्याला अधिकार नाही. जर आपण स्वतःबद्दल सकारात्मक राहायला शिकलो , "मला हे जमेल का?" ह्यापेक्षा "हो, मला हे जमेलच!" हा सकारात्मक विचार जर आपण आपल्या मनात आणला आणि स्वतःवर विश्वास ठेवून जर प्रयत्न केले तर नक्कीच यश आपल्या पदरात पडतच आणि जरी नाही यश आल तरी त्या सकारात्मक विचारांमुळे, सकारात्मक ऊर्जेमुळे आपण स्वतःला हे समजवू लागतो,"ठीक आहे ह्यावेळेला नाही जमल पण पुढच्या वेळेला अजुन प्रयत्न करेल" ह्यामुळे आपलंच आयुष्य खूप सोपं होत, वाट्यातले अडथळे कमी होऊन आपण पर्याय शोधू लागतो.
जगाच्या शर्यतीमध्ये जर आपल्यासोबत कोणी असेल ते स्वतः आपण आहोत. इथे टिकून राहायचं आहे तर कठोर प्रयत्न हे करावे लागणारच. यशाने हुरळून न जाता आणि अपयशाने खचून न जाता येणार प्रत्येक आव्हाहन पेलण्याची जिद्द आपल्या मनात फक्त आपण तयार करू शकतो त्यासाठी सकारात्मक विचार, अमाप कष्ट करण्याची तयारी आणि ध्येय साकारण्याची धडपड आपल्या अंगी हवी.
आपण नेहमी कशाला तरी घाबरत असतो आणि ती भीती आपल्याला यशापासून मागे खेचते परंतु जर त्या भीतीच रूपांतर आपण आत्मविश्वासात केलं तर आपले अर्धे प्रश्न आपोआप सुटतील.
आपल्या सगळ्यांनाच एका चौकटीत राहायची सवय झालेली आहे. त्या चौकटीमध्ये आपल्याला सगळ्याच गोष्टी खूप सोप्या आणि सोईस्कर वाटू लागतात परंतु जेव्हा ती चौकट सोडून बाहेर पडण्याची वेळ आपल्यावर येते तेव्हा मात्र आपण डगमगू लागतो, आपला आत्मविश्वास संपतो आणि आपण हरतो, यशाला मुकतो. पण जर त्या चौकटीत असतानाच आपण स्वतःला आव्हाहन पेलायला सक्षम बनवलं तर आपल्यावर यशाला मुकायची वेळ येणारच नाही. यश हा खूप सुंदर अनुभव आहे आणि तो ह्या चौकटीच्या बाहेर पडल्यावरच कळतो.
समर्थ रामदासांनी म्हणले आहे,
जगी सर्व सुखी असा कोण आहे
विचारे मना तूचि शोधूनी पाहे||
Written By:
Sayali Chobe
अप्रतिम लेख 👌🏻
ReplyDelete